महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भुजबळांनी स्वतः केली बीअर बारवर कारवाई, कोरोना नियम मोडणारे हॉटेल्स-बार सील

नाशिकमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ रस्त्यावर उतरले. काही हॉटेल्सवर कारवाईही केली. तसेच, पंचवटीतील दोन बारही सील करण्यात आले आहेत.

nashik
नाशिक

By

Published : Mar 29, 2021, 3:37 PM IST

नाशिक :राज्यभरात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. शिवाय, लॉकडाऊन लागू करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करा, असे आदेशही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिले आहेत. नाशिकमध्येही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशात 27 मार्च रोजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्रिमूर्ती चौक येथील गंगोत्री बीअर बारवर छापा टाकत कारवाई केली. मात्र, 28 मार्च रोजी याच हॉटेल चालकाची मुजोरी दिसून आली. त्यामुळे हे हॉटेल मनपाने सील केले आहे.

स्वतः छगन भुजबळ उतरले रस्त्यावर -

नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या महिन्याभारत कोरोना रुग्णांचा आकडा 25 हजारवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यानुसार, सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही हॉटेल-बारमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोना नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ स्वतः रस्त्यावर उतरल्याचे दिसले. त्यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले.

कोरोना नियम मोडणाऱ्यांना कान पकडण्याची शिक्षा

भुजबळांची हॉटेलवर कारवाई, तरीही मालकाची मुजोरी; मग काय हॉटेलच सील -

भुजबळ यांनी शनिवारी रात्री त्रिमूर्ती चौकातील कामटवाडे रोडवरील हॉटेल गंगोत्री बीयर बारवर छापा टाकत कारवाई केली. पण, रविवारी पुन्हा हॉटेल चालकाची मुजोरी दिसून आली. हॉटेलमध्ये कुठल्याही कोरोना नियमांचे पालन केल्याचे दिसले नाही. परिणामी या हॉटेलवर कारवाई करत हॉटेल मालकाला पाच हजार रुपये दंड आणि इतर 19 मद्यपींना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला. तसेच, नाशिक महानगरपालिकेकडून हे हॉटेल सीलही करण्यात आले.

पंचवटी भागातील दोन हॉटेल सील -

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या पंचवटीतील दोन हॉटेलवर महानगरपालिका आणि पोलीस पथकाने कारवाई केली. दोन्ही हॉटेल अनिश्चित काळासाठी सील करण्यात आले आहेत. यात मालेगाव स्टँड वरील न्यू पंजाब रेस्टॉरंट अँड बार आणि आडगाव नाका येथील पल्लवी रेस्टॉरंट अँड बार यांचा समावेश आहे. हॉटेलमध्ये 50 टक्‍क्‍यांपर्यंत उपस्थिती अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन्ही हॉटेलवर काही दिवसांपूर्वी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील या हॉटेलमध्ये पुन्हा गर्दी होत असल्याचं मनपा आणि पोलिस पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर पुन्हा कारवाई करत ही दोन्ही हॉटेल अनिश्चित काळासाठी सील करण्यात आली.

हेही वाचा -मेळघाटात खासदार नवनीत राणांचे होळी निमित्त आदिवासी नृत्य

हेही वाचा -'माझं मंगळसूत्र गहाण ठेवा पण विज कापू नका', मोझरीतील महिलेची महावितरणच्या अधिकाऱ्यांना विणवणी

ABOUT THE AUTHOR

...view details