नाशिक - कोरोना संकटाबाबत मोदी सरकार गंभीर दिसत नसून त्यांचे वागणे हे बेफिकिरीचे आहे. कोरोनाचे संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. देशात कोरोनाचा जो उद्रेक झाला त्यास केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. गंगेच्या पात्रात अनेकांचे शवं वाहत होते. हे पाप मोदी सरकारचे असल्याचा घणाघात काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
थोरातांनी लावले मोदींवर गंभीर आरोप -
केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त देशभरात काॅंग्रेसकडून रविवारी (दि. ३०) आंदोलन करण्यात आले. थोरात यांनी एमजीरोड येथील शहर काॅंग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला. मोदी सरकारने मोठी आश्वासने दिली होती. १५ लाख रुपये खात्यावर देऊ, काळा पैसा परत आणू, महागाई कमी करु असे सांगितले. पण आता पेट्रोल शंभर पार झाले. एलपीजी गॅस नऊशेवर गेला. खाद्यतेल दोनशे रुपये लिटरवर झाले. कामगार कायद्यामध्ये बदल करताना कामगारांऐवजी मालकांना विचारात घेतले गेले. दिल्लीत शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला. कोरोना संकट येणार काळजी घ्या हे राहुल गांधी यांनी आधीच सांगितले. पण त्यांचे ऐकले नाही आणि कोरोना वाढला. थाळ्या वाजवणे, दिवे लावणे हा उपाय नव्हता. निवडणुकीचे मेळावे, धार्मिक मेळावे यामुळे कोरोना वाढला. असे गंभीर आरोप या वेळी थोरात यांनी केले आहे.
मतभेद असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत -
राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. मतभेद असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत, परंतु आम्ही प्रत्येक वेळी चर्चेतून मार्ग काढत असतो, असा दावा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, देशांमध्ये तेलाच्या किमती वाढण्यामागे केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. त्यांनी आपले धोरण बदलावे म्हणजे किमती कमी होतील.