सटाणा(नाशिक)- निसर्ग चक्रीवादळाच्या काळात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने बागलाण तालुक्यात अनेक जनावरे मृत्यूमुखी पडण्यासोबतच घरांची पडझड व शेतमालाच्या झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल भरपाईसाठी शासनाकडे पाठवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
बागलाण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या पावसात पशुधन, घरे आणि डाळिंब बागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. तालुक्यातील राहुड, वघानेपाडा, टिंगरी, श्रीपूरवडे, ढोलबारे येथील बारा शेतकऱ्यांच्या सोळा गायी, बारा वासरे, शेळ्या, बोकड आणि मेंढ्या अशी ६७ जनावरे मृत्यूमुखी पडून सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.