नाशिक :एक उंट प्रवेशद्वारावरच जखमी झाल्याने त्यास पांजरपोळा येथेच ठेवण्यात आले. 98 उंट पोलीस एस्कॉर्टमध्ये राजस्थानकडे रवाना करण्यात आले. रोज 25 किलोमीटर प्रवास करून तब्बल 25 दिवसानंतर या उंटांचा कळप राजस्थानला पोहोचणार आहेत. 4 मे रोजी तस्करीसाठी जात असलेल्या उंटाची माहिती नाशिकच्या प्राणी मित्रांना मिळाली होती. त्यानंतर 111 उंटांना जिल्हा प्रशासनांनी ताब्यात घेत, उंटांच्या संगोपनाची जबाबदारी नाशिक पांजरपोळा संस्थेला दिली होती. मात्र, हजारो किलोमीटर लांब पायपीट करून आल्यानं वातावरणातील बदलामुळे 111 पैकी 12 उंटांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूची संख्या लक्षात घेत प्राणी मित्रांसह पांचरपोळा संस्थेने उंट राजस्थानला पुन्हा घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र व्यवहार केला होता. यानंतर राजस्थान येथील कॅमल सेंचुरीया संस्थेने या उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. त्यानुसार राजस्थान येथून उंटांना संभाळणारे सात रायका गुरुवारी पांजरपोळा येथे दाखल झाले होते. सकाळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गिरीश पाटील, डॉक्टर साखरे, डॉक्टर वैशाली थोरात यांनी पांजरपोळा येथे भेट देत उंटांची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र रायकांना दिल्यानंतर हे उंट राजस्थानकडे रवाना झाले. रोज 25 किलोमीटर इतका प्रवास करून हे उंट राजस्थान येथे पोहोचणार आहे. यासाठी तब्बल 10 लाखांचा खर्च येणार आहे..
सात जणांवर गुन्हा दाखल :अन्नपाण्याविना हे उंट शेकडो किलोमीटरवर अंतरावरून पायी चालवून आणल्याने त्यांना अशक्तपणा आल्यामुळे त्यातील आठ उंटांचा मृत्यू झाला. उंटांच्या छळाबाबत ओरड झाल्यानंतर, थेट राज्यपालांनी याची दखल घेतल्यानंतर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमप यांनी चर्चा करून दिंडोरी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुटिया सय्यद, अस्लम सय्यद, शहाणूर सय्यद, सलीम सय्यद, इजाज सय्यद, दीपक सय्यद, शाहरुख सय्यद या सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र लहारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला..
उंटांच्या पायांना जखमा :29 उंटांचा जथा वणी येथून दिंडोरी हद्दीतील कळवण रोडवर आला. त्यावेळी पोलिसांनी संशयितांकडे उंटाबाबत विचारणा केली. मात्र, संशयितांनी पोलिसांना ठोस उत्तर दिले नाही. तेव्हा पोलिसांनी दिंडोरी पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशूधन विकास अधिकारी डॉ. राहुल कोठाळे यांनी 29 उंटांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात हे उंट तहानलेले अशक्त असल्याचे तसेच त्यांना जास्त चालवल्याने त्यांच्या पायांना जखमा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.