नंदुरबार - शहादा तालुक्यातील कर्जोत गावात पाण्याच्या टंचाईमुळे, नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र याकडे लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेले प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नंदुरबारः कर्जोत गावात पाणीटंचाई; लोकप्रतिनिधींच्या विरोधात ग्रामस्थांमधून संताप
शहादा तालुक्यातील कर्जोत गावात पाण्याच्या टंचाईमुळे, नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कर्जोत गावात शासनाची नळपाणी योजना आहे. मात्र, बोरवेल आणि विहिरी पाण्याअभावी आटल्याने गावात सद्या स्थितीत १५ ते २० दिवसांनी नावापुरते नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना पाण्याच्या समस्येबद्दल वेळोवेळी सांगितले. तरी लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन दिले जात आहे. खासदार, आमदार, नेते मंडळी निवडणुकीपुरते गावात येतात, निवडणूका संपल्या की गावाकडे फिरकत देखील नाहीत. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावात नळ पाणी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या ४ विहिरी व २ बोरवेलमधून पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी हे जलसाठे कोरडे पडले आहेत. सद्य स्थितीत गावात एकमेव हात पंप आहे. त्या हातपंपावरही मुबलक पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रामुख्याने महिला वर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पाणी समस्येवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा नागरिकांनी दिला आहे.