नंदुरबार- शहादा तालुक्यातील कोंढावळ खापरखेडा गावाजवळील रंगुमती नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले होते. या धरणाला आता जवळपास ५० वर्षे होत आली असूनही, धरणाची आतापर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याचा अपेक्षित प्रमाणात साठा होत नाही. याचा परिणाम तालुक्यातील शेतकऱ्यांवर तसेच नागरिकांवर होत आहे.
गेल्या 8 ते 10 वर्षांपासून पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष श्री लालचंद माळी आणि शेतकरी वर्ग या धरणाच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत. मात्र, संबंधित विभाग त्याकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
धरणाची दुरुस्ती न केल्यास निवडणुकांवर टाकणार बहिष्कार! या धरणामुळे कोंढावळ, वडाळी, जयनगर, बोराळे, धंद्रे, बामखेडा या गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून धरणामधील गाळ देखील काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणाच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.
धरणातील गाळ काढावा, धरणाची दुरुस्ती करण्यात यावी आणि धरणाची उंची वाढवावी या गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास, येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.