महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरट्यांनी मारला जैन मंदिराच्या दानपेटीवर डल्ला, 20 लाखांचा ऐवज लंपास

मंदाणे गावाच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच दिवशी घरफोड्या झाल्याची घटना घडली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांनी घरफोड्या करत शहादा पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

nandurbar
चोरट्यांनी मारला जैन मंदिराच्या दानपेटीवर डल्ला, 20 लाखांचा ऐवज लंपास

By

Published : Feb 4, 2020, 12:11 PM IST

नंदुरबार - शहादा तालुक्यातील मंदाणे येथे मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत आठ घरांसह जैन मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकडसह सुमारे 20 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. यावेळी श्‍वानासह ठसे तज्ज्ञ पथकास पाचारण करण्यात आले.

चोरट्यांनी मारला जैन मंदिराच्या दानपेटीवर डल्ला, 20 लाखांचा ऐवज लंपास

मंदाणे गावाच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच दिवशी घरफोड्या झाल्याची घटना घडली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांनी घरफोड्या करत शहादा पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. शहादा तालुक्याच्या पूर्व भागातील मंदाणे हे मोठ्या बाजारपेठेचे ठिकाण असून मध्यप्रदेश राज्याच्या सिमेलगत आहे. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदाणे गावात धुमाकूळ घालून 8 घरांसह जैन मंदिराची दानपेटी फोडली.

हेही वाचा -नंदुरबार जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

गावाच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या शिवाजी नगरातील प्राथमिक शिक्षक शशिकांत रामराव बेहरे हे दोन दिवसांपासून कुटुंबासह नातवाला पाहण्यासाठी नाशिक येथे गेले होते. चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत कपाटाचे लॉकर तोडले आणि 34 तोळे सोने तसेच चांदीचे दागिने आणि 65 हजारांची रोकड, असा 14 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा गावातीलच विश्‍वास बाजीराव मोरे यांच्या घराकडे वळवून घरफोडी केली. मोरे यांच्या घरातूनही दीड तोळे सोन्याचे दागिने आणि 7 हजार 500 रुपयांची रोकड, असा एक लाखांचा ऐवज चोरला.

हेही वाचा -नंदुरबार जिल्ह्यातील दुचाकी चोरटा गजाआड; 28 दुचाकी जप्त

चोरट्यांनी गावात एकाच रात्री हिंमतराव उत्तम मोरे, चिंतामण पितांबर मोरे, दिनकर नाटू पवार, भीमराव बेहरे, सचिन साहेबराव बेहरे, विश्‍वास बाबुराव पवार यांच्याही बंद घराचे कुलूप तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. याठिकाणी हाती काहीच लागले नाही. त्यामुळे मंदाणेकर गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी गावालगतच्या जैन मंदिराकडे आपला मोर्चा वळविला. जैन मंदिरातील दानपेटी फोडून चार ते पाच हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. मंदाणे गावात मध्यरात्री धुमाकूळ घालत चोरट्यांनी 8 घरांसह जैन मंदिराच्या दानपेटीवरही डल्ला मारला.

या चोरीच्या घटनेची माहिती सकाळी गावात वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती. गावाचे पोलीस पाटील सुभाष भिल यांनी घटनेची माहिती शहादा पोलिसांना दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळ, पोलीस निरीक्षक नजन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, उपनिरीक्षक विक्रांत कचरे, स्थानिक गुन्हे शाखेचे योगेश राऊत हे पथकासह मंदाणे गावात घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. यावेळी श्‍वानाने मंदाणे गावाच्या मुख्य रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला. परंतु, तेथेच श्‍वान घुटमळत राहिला. त्यामुळे चोरट्यांचा पुढील मार्ग घेण्यास श्‍वानला शक्य झाले नाही. चोरट्यांच्या या घरफोडीच्या सत्रामुळे शहादा पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घरफोडींची रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ABOUT THE AUTHOR

...view details