नंदुरबार -नंदुरबार येथील भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पथकातील निशा पावरा या महिला तलाठी यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे. गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरात मधून महाराष्ट्रात वाळू वाहतुकीची झिरो स्वामीत्व (रॉयल्टी) पावती नव्हती. म्हणून या तपासणी पथकाने दोन तास वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला होता. यामुळे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक गौरव चौधरी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
नगरसेवकाकडून महिला तलाठी यांना मारहाण
दरम्यान, ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तलाठी निशा पावरांसह अन्य दोन महिला तलाठी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांच्या वाहनातून पाठलाग करुन ट्रक अडवला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नगरसेवक गौरव चौधरी आणि पथकातील महिला तलाठी यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठीसोबत शिवीगाळ करत त्यांना धक्काबुकी करुन मारहाण केली. यानंतर संतप्त तलाठींसह महसुलच्या सर्व अधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.