नंदुरबार - नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू अलर्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. अलर्ट झोनमधील कुक्कुट पक्षी आणि अंडी वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. या अलर्ट झोनमध्ये नवापूर तालुक्यातील 22 गावांचा समावेश आहे.
नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू अलर्ट झोन तक्रारीनंतर प्रशासनाने काढला अलर्ट झोनचा आदेश -
नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फार्ममधील हजारो कोंबड्या मरण पावल्या आहेत. या मृत कोंबड्यांना खड्ड्यात बुजवण्यात आल्याची निनावी तक्रार नवापूर तहसीलदारांकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसील प्रशासनाने पोल्ट्री फार्ममध्ये तपासणी केली असता हजारोंच्या संख्येने कोंबड्या मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर प्रशासनाने मृत कोंबड्यांचा पंचनामाकरून त्यांचा मृत्यू बर्ड फ्लू किंवा राणीखेत या आजारामुळे झाला का? हे तपासण्यासाठी नमुने पुण्यातील औंध रोग अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आले आहे. रोगनिदान प्रलंबित असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व संसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिबंधक नियंत्रण अधिनियम 2009 नुसार नवापूर तालुका बर्ड फ्लू सतर्क क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले.
तालुक्यातील 22 गावांमध्ये अलर्ट -
नवापूर तालुक्यातील करंजी खुर्दे, वाकीपाडा, विजापूर, लहान चिंचपाडा, जामनी, जामतलाव, घोडजामन, कोठडा, काळंबा, मावचीफळी, किलवनपाडा, नांदवण, बेडकीपाडा, बंधारफळी तसेच रायंगण, रापुर, बोकळझर, पायरविहीर, गडद, बिलमांजरे, बंधारपाडा, आमपाडा गावांचा परिसर बर्ड फ्लू अलर्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. अलर्ट झोनमधील जिवंत व मृत पक्षी, अंडी, कोंबडी खत, पशुखाद्य वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.
खबरदारी घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना -
पोल्ट्री व्यावसायिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभावित क्षेत्रात उघड्यावर मृत पक्षी अथवा कोंबड्या फेकण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. दरम्यान, सन 2006 साली आलेल्या बर्ड फ्लूमुळे नवापूर तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या हजारो कोंबड्या मरण पावल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. आता पुन्हा गेल्या आठ दिवसात नवापूर तालुक्यातील पोट्री फार्ममध्ये 20 ते 22 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
प्रशासनाकडून देण्यात आलेली नियमावली
- दिवसभरात पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोल्ट्रीमध्ये जाऊन तपासणी करणे.
- पोल्ट्री व्यावसायिकांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना देणे.
- प्रभावीत क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांना ये-जा करण्यास मनाई करण्यात यावी आणि त्या ठिकाणची खासगी वाहने प्रसारित परिसराच्या बाहेर लावण्यात यावी.
- प्रभावीत क्षेत्रात जिवंत व मृत वन्यपक्षी/कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडी खत, पशुखाद्य अनुषंगिक साहित्य व उपकरणे इत्यादींच्या वाहतुकीस मनाई करण्यात यावी.
- व्यावसायिक पोल्ट्री फार्ममध्ये मालक/कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन ग्लोव्हज्, मास्क इत्यादी साहित्यांसह काम करावे.
- फार्म सोडताना स्वतःचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.