नंदुरबार - पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आदिवासी विकास विभागाच्या केंद्रिय स्वयंपाकगृहातून झालेल्या संशयास्पद दूध पुरवठ्याबाबत संबंधित ठेकेदाराला तंबी देत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच, प्रकल्पाधिकारी जितेंद्र डोडी यांनीही केंद्रीय स्वयंपाकगृहाला भेट देऊन तपासणी केली.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : आदिवासी विकास विभागाच्या एक्सपायर दूध वाटप प्रकरणी स्वयंपाकगृह चालक संस्थेला तंबी
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आदिवासी विकास विभागाच्या केंद्रीय स्वयंपाकगृहातून झालेल्या संशयास्पद दूध पुरवठ्याबाबत संबंधित ठेकेदाराला तंबी देत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच, प्रकल्पाधिकारी जितेंद्र डोडी यांनीही केंद्रीय स्वयंपाकगृहाला भेट देऊन तपासणी केली.
जितेंद्र डोडी यांनी स्वत: केंद्रीय स्वयंपाकगृहातल्या दुधाचे फॅट तपासून पाहिले. यापुढे स्वयंपाकगृहातून फक्त अमुल कंपनीचे दूध वितरीत करण्याचे आदेशही त्यांनी स्वयंपाकगृहाची चालक असलेल्या स्त्री शक्ती संस्थेला दिले आहेत. केंद्रीय स्वयंपाकगृहामधील प्रयोगशाळेत दररोज अन्नाची तपासणी करुन त्याचा अहवाल कार्यालयात सादर करण्याचा आदेश त्यांनी यावेळी संस्थेला दिला.
आदिवासी विकास विभागाच्या केंद्रीय स्वयंपाकगृहातून हजारो विद्यार्थ्यांना एक्सपायर झालेल्या दुधाच्या पिशव्या वितरीत करण्यात आल्याची घटना ईटीव्ही भारतने उघडकीस आणली होती. तिचाच हवाला देत आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेकांनी या विषयावर कारवाईची मागणी केल्याने अखेर प्रशासनाला जाग आली आहे.