नंदुरबार - आंध्रप्रदेशातून विक्रीसाठी आलेल्या एकाकडून सुमारे पावणेचार लाखांचा सुका गांजा जप्त करण्यात आला आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या रेल्वे कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंध्रप्रदेशातून विक्रीसाठी आलेला पावणेचार लाखाचा सुका गांजा जप्त शहरातील मध्यवर्ती भागात गांजाची विक्री
आंध्रप्रदेशातील एक व्यक्ती नंदुरबार शहरात सुका गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली. यावेळी त्यांच्या पथकाने शहरातील मध्यवर्ती भागातील रेल्वे कॉलनी परिसरात सापळा रचला. गांजा विक्रीसाठी आलेल्या शहानवाज खान जाफर खान पठाण (रा.बेरीचौडा आंध्रप्रदेश) व दुचाकीस्वार सुदाम रमेश टिळंगे (रा.कंजरवाडा, नंदुरबार) या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ५ किलो ६०० ग्रॅम वजनाचा सुका गांजा, वाहन, वजनकाटा असा एकुण ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिर्हाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहानवाज खान जाफर खान पठाण (रा.बेरीचौडा आंध्रप्रदेश) व दुचाकीस्वार सुदाम रमेश टिळंगे (रा.कंजरवाडा, नंदुरबार) या दोघांविरुध्द एनडीपीएस अॅक्ट १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत.