नांदेड - विठ्ठल गोडसे आणि अमोल चौधरी या युवकांच्या सतर्कतेमुळे कॅनॉलमध्ये बुडणाऱ्या महिला व चिमुकल्या दोन मुलांचे प्राण वाचले आहे. दरम्यान, महामार्ग पोलिसांच्या तत्परतेने त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून महिला आणि दोन्ही मुलांची प्रकृती सुखरूप आहे.
ताबा सुटल्याने कार वाहत्या पाण्यात पडली -
जिल्ह्यातील हसापुर येथील दत्ता कोंडिबा जाधव आपल्या पत्नी व दोन चिमुकल्यांसह स्वतःच्या कारने गावाकडे जात होते. नांदेड-भोकर मार्गावर बारडपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावरून जात असताना गाडीचा ताबा सुटल्याने कार कालव्यात कोसळली. त्यानंतर दत्ता जाधव यांनी सावधानता दाखवत उडी मारली; परंतु पत्नी व दोन चिमुकल्यांसह कार कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडली. दत्ता जाधव यांनी पत्नीवर चिमुकल्यांना वाचवण्यासाठी जोरात आरडाओरडा केला असता तेथून जाणारे विठ्ठल गोडसे व अमोल चौधरी हे दोघे युवक घटनास्थळी दाखल झाले. तसेच कारचा दरवाजा उघडून रुक्मिणीबाई जाधव, प्रगती जाधव, विकास जाधव या तिघांना दोरीच्या साहायाने बाहेर काढले.