नांदेड :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात करत जिल्ह्यातील नागरिकांना योजनेचा लाभ जास्तीत जास्त संख्येने देण्यात यावा, यासाठी अब्जल नगर येथे भव्य दिव्य असे मंडप उभारत योजना राबवणार आहेत. त्या निमित्ताने राज्यातील प्रमुख नेते नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आसना नदी पुलावर आंदोलन करत नारळ फोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील एक वर्षांपूर्वी आसना नदीच्या पुलाची मंजुरी देत कामाचे भूमिपूजन केले होते, पण अद्यापही कामाची सुरुवातही झाली नाही.
केवळ नारळ फोडण्याचे काम :दरवर्षी मोठ्या पुरांचे पाणी आसना नदीच्या पुलावरून जाते. पूलाची रुंदी वाढवण्यासाठी अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी होती. नांदेड वसमतकडे जाणारा प्रमुख मार्ग हा आसना नदीवरूनच जातो. पावसाळ्यात पुलावरून पाणी गेल्याने येथील रहदारी ठप्प होते एक वर्ष होऊनही अद्याप कामाची सुरुवात झाली नाही. काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करत आसना नदी पुलावर नारळ फोडत आंदोलन केले. सरकार केवळ नारळ फोडण्याचे काम करीत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली.
आमदार बालाजी कल्याणकर हे केवळ नारळ फोडण्याचे कामच करत आहे. - विठ्ठल पावडे
कामे होत नसल्याचा विरोधकांचा आरोप :शिंदे गटातील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील हा पूल आहे. मतदारसंघातीलच कामे होत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पूर्णा रोड येथील रस्त्याच्या कामाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काम सुरू झाले होते. पण काम आमदार बालाजी कल्याणकर यांनी बंद पाडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. पूर्णा रोडवरील अनेक दिवसापासून हे काम बंद आहे. या भागातील नागरिकांना रहदारीस अडचण निर्माण होत आहे. असल्याची संतप्त प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी दिली.