नांदेड- दोन मोकाट जनावरांमध्ये सुरू असलेली टक्कर सोडवणे एका वयोवृध्दाच्या जीवावर बेतले आहे. जनावरांची टक्कर सोडवायला गेलेल्या वृध्दाला बैलाने धडक दिल्याने वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) सकाळी गुरुद्वारा गेट नंबर ३ जवळ घडली.
नांदेडः मोकाट जनावरांची टक्कर सोडवणे वृद्धाच्या बेतलं जीवावर
दोन मोकाट जनावरांमध्ये सुरू असलेली टक्कर सोडवणे एका वयोवृध्दाच्या जीवावर बेतले आहे. जनावरांची टक्कर सोडवायला गेलेल्या वृध्दाला बैलाने धडक दिल्याने वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) सकाळी गुरुद्वारा गेट नंबर ३ जवळ घडली.
लक्ष्मण डोंगे (वय ६८) असे बैलाने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. मृत हे मुखेड तालुक्याच्या अखडगाव येथील रहिवासी असून ते गुरुद्वारा परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गुरुद्वारा गेट नंबर 3 जवळ २ बैलांमध्ये टक्कर सुरू होती. यावेळी तेथून जात असलेल्या लक्ष्मण डोंगे यांनी बैलाची टक्करी सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोकाट बैलाने त्यांना धडक दिली.
जखमी झालेल्या लक्ष्मण डोंगे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेने शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला. महापालिकेचा कोंडवाडा असूनही महापालिकेकडून या मोकाट जनावराचा बंदोबस्त केला जात नसल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.