नांदेड- लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार (२६ मार्च) हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर सर्वच पक्षांच्या मिरवणूकांनी गजबजून गेला होता. अखेर ५९ उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत ९४ अर्ज दाखल केले.
आज शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी ३७ अर्ज दाखल केले. आज अखेर लोकसभा निवडणुकीसाठी ५९ उमेदवारांचे ९४ अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी युतीचे प्रताप पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे, सपा-बसपा युतीचे अब्दुल समद यांनी मिरवणुकीतून शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले.
महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जुनामोंढा भागातून मोठी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यात शिवसेना, भाजप, रासपा आणि रिपाइं आठवले गट यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज डॉ. यशपाल भिंगे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह व कार्यकर्त्यांसह मिरवणुकीद्वारे अर्ज दाखल केला. सपा-बसपाचे उमेदवार अब्दुल समद अब्दुल करीम यांनीही जुन्या भागातून प्रचंड मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा २९ मार्च शेवटचा दिवस आहे. या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.