नांदेड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अडचणीत सापडलेल्या गरजवंतांना मदत करण्याची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. गरजूंना मदत करण्यासाठी सर्व भाजप कार्यकर्ते 'ग्राऊंडलेवल'वर काम करीत असल्याचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात सुरू असलेल्या उपाययोजनांचा खासदार चिखलीकर यांनी गुरुवारी भोकर येथे अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यावेळी बोलताना चिखलीकर म्हणाले की, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, घरात थांबून सुरक्षित राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा परिस्थितीत कोणीही उपाशी राहू नये अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठांनी घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात असलेल्या स्थानिक आणि परराज्यातून कामासाठी आलेल्या प्रत्येकांना मदत करण्यासाठी मी वेळोवेळी माहिती घेऊन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या अन्नधान्याचे वाटप सरू झाले आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशांची माहिती घेऊन त्यांना मदत करावी, असे मी भाजप कार्यकर्ते आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
यावेळी आरोग्य विभाग आणि महसूल विभागाकडून उपलब्ध धान्याच्या साठवणुकीची माहिती घेतली. सध्या दुर्लक्षित असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी माहिती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. परराज्यातून शहरात कामासाठी आलेल्या अनेक कामगारांना चिखलीकर यांनी अन्नधान्याचे तर पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटाईझरचे वाटप केले.