नांदेड- मोठा गवगवा करुन हजारो कोटी रूपयांचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे जिल्ह्यात निर्माण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक रस्ते या कामासाठी खोदून ठेवले आहेत. परंतु मागील दोन वर्षांपासून या कामांना कोणतीही गती देण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यात चिखल का चिखलात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे अनेकांचे बळी जात आहेत. हे थांबविण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व रस्त्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची सीबीआयमार्फत चौकशी करा - आमदार राजूरकर
जिल्ह्यातील अनेक रस्ते या कामासाठी खोदून ठेवले आहेत. परंतु मागील दोन वर्षांपासून या कामांना कोणतीही गती देण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यात चिखल का चिखलात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे अनेकांचे बळी जात असल्याचा आरोप आमदार राजूरकरांनी केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील 361 क्रमांकाच्या बोरीबुट्टी ते तुळजापूर रस्त्याचे काम जैसे थे परिस्थितीत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक इमारती या कामासाठी पाडण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला खोदकाम केले आहे. या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. नांदेडहून लातूरकडे जाणारा रस्ता जिवघेणा बनला आहे. या रस्त्याचे सोलापूर व लातूर जिल्ह्यात मोठे काम झाले आहे. बाजूच्या यवतमाळ जिल्ह्यात देखील कामाला गती मिळाली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात मात्र राष्ट्रीय महामार्गाचे या रस्त्यावरील एक मिटरसुद्धा काम झाले नसल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या पत्रकात केला आहे.