नांदेड - उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लहान-चाभरा वितरिकेतून गरज नसताना पाणी सोडले. तेच वाहते पाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्धापूर ते तामसा रोडवरील पुलाच्या बांधकामामुळे अडविण्यात आले. त्यामुळे वितरिकेचे पाणी हरभरा व हळद पिकाच्या शेतात शिरले. परिणामी, दोन शेतकऱ्यांचे अंदाजे सात लाखाचे नुकसान झाल्याची तक्रार लोणी खुर्द (ता.अर्धापूर) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. झालेली नुकसान भरपाई न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पाटबंधारे, बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे नुकसान, नुकसान भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा
नांदेड जिल्ह्यातील लोणी खुर्द (ता.अर्धापूर) येथील अल्पभुधारक शेतकरी मारोतराव आनसाजी सांगोळे याचे गट क्रमांक १६९ मध्ये १ हेक्टर शेतजमीन असून सध्या या शेतात हरभऱ्याचे उभे पीक आहे. त्यांच्या शेतीच्या बाजूने असलेल्या अर्धापूर- तामसा रोडच्या नालीमध्ये प्रत्येक रोटेशनला उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लहान-चाभरा वितरिकेचे अनावश्यक पाणी जुनी नदीमध्ये सोडले जाते.
जिल्ह्यातील लोणी खुर्द (ता.अर्धापूर) येथील अल्पभुधारक शेतकरी मारोतराव आनसाजी सांगोळे याचे गट क्रमांक १६९ मध्ये १ हेक्टर शेतजमीन असून सध्या या शेतात हरभऱ्याचे उभे पीक आहे. त्यांच्या शेतीच्या बाजूने असलेल्या अर्धापूर-तामसा रोडच्या नालीमध्ये प्रत्येक रोटेशनला उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लहान-चाभरा वितरिकेचे अनावश्यक पाणी जुनी नदीमध्ये सोडले जाते. १२ मार्चला या नालीमधून पाणी सोडण्यात आले. परंतु, जुनी नदीवर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने संबंधित नालीतून येणारे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे हे पाणी मारोतराव सांगोळे यांच्या शेतात शिरले. त्यामुळे शेतातील माती आणि हरभऱ्याचे उभे पीक खरडून गेले आहे. यात त्यांचे अंदाजे ३ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्याच शेजारी असलेल्या गट क्रमांक १६८ मधील शेतकरी सुनिता देवानंद वानखेडे यांच्या ४५ आर शेतजमीनीत हळदीचे पीक आहे. या हळदीच्या उभ्या पिकात पाणी शिरल्याने त्यांचे अंदाजे ३ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्हीही शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा मारोतराव सांगोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, राज्य सचिव, आयुक्त, पालकमंत्री आदींसह सर्व संबंधितांना देण्यात आले आहे.