नांदेड- भाजपने उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या २ दिवसात प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव जाहीर केले. हे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून अपेक्षेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे नाव घोषित करण्यात आले. जिल्ह्यातील राजकीय आखाड्यात विविध निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या या दोघात सामना झाला. पण पहिल्यांदाच एकेकाळचे कट्टर मित्र आणि कट्टर राजकीय विरोधक असणारे 'अशोकराव विरुद्ध प्रतापराव' असा सामना होणार आहे.
नांदेडच्या राजकारणात अशोक चव्हाण यांनी आत्तापर्यत सर्व डाव परतवून लावले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात अशोक चव्हाण यांना 'चेक' देण्यात भाजपा यशस्वी होईल का? याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आमदार अमिता चव्हाण ह्या एकमेव दावेदार होत्या. पण राजकीय हवामानाचा अंदाज घेऊन काँग्रेसच्या उमेदवारी बाबतही आता संभ्रमावस्था निर्माण झाली होती. भाजपच्या उमेदवारीवर काँग्रेसचे गणित ठरणारे होते. तर दुसरीकडे भाजपमध्येही काँग्रेसकडून खुद्द अशोक चव्हाण उमेदवार राहिल्यास त्यास तोडीस-तोड म्हणून तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत होते.
त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात उमेदवारीबाबत संभ्रमावस्था असल्याचे चित्र होते. पण शुक्रवारी रात्री भाजपाने घोषित केलेल्या यादीत प्रताप पाटील-चिखलीकर यांची उमेदवारी घोषित झाली. तर शनिवारी रात्रीच्या यादीत काँग्रेसकडून खासदार अशोक चव्हाण यांचे नाव घोषित करण्यात आले. दोन्हीकडून मातब्बर उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीला आता चांगलाच रंग आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही नांदेडचा काँगेसचा किल्ला चव्हाण यांनी शाबूत ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष्य इकडे वेधले होते. गेल्या अनेक निवडणुकीत भाजपने चव्हाण यांच्या किल्ल्याला भेदण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी विरोधकांना परतवून लावले.