नांदेड- जिल्ह्यात कोरोना तपासणीच्या स्वॅबचे अहवाल मिळण्यास पूर्वीसारखा वेळ लागणार नाही. कारण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा कोविड-१९ प्रयोग शाळा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेवर येणारा अतिरिक्त ताण कमी होणार असून नमून्यांचा अहवाल वेळेत प्राप्त होऊ शकणार आहे.
सुरुवातीच्या काळात नांदेड येथील कोरोना तपासणीचे अहवाल हे औरंगाबाद व पुणे येथे जात होते. परंतु केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या बायोलॉजी विभागात ही प्रयोग शाळा सुरु करण्यात आली. या प्रयोग शाळेकडे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील स्वॅब तपासणीला येत होते. तसेच नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी येत असल्याने अहवाल येण्यास विलंब होत होता. यावरून बऱ्याच वेळा ओरड होत असे.यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेतला. यामुळे नियोजन समितीच्या निधीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे.