नांदेड- हाताला काम नसल्याने मुखेड तालुक्यातील दोन हजार मजूर तेलंगणात रोजगार शोधण्यासाठी गेले होते. तेथे मिरची तोडण्याचे काम देखील त्यांना मिळाले, मात्र दि. 24 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा फटका या मजुरांना बसला आहे. तालुक्यातील तब्बल दोन हजार मजूर तेलंगणातील कोठागूडूम जिल्ह्यात अडकले आहेत. यामुळे नातेवाईक चिंतेत आहेत.
मुखेड तालुका हा डोंगराळ भाग आहे. या भागात वाडी-तांड्यांची संख्या जास्त आहे. येथील बंजारा बांधव शेतीची कामे उरकून रोजगारासाठी इतर ठिकाणी काम शोधतात. तेलंगणाच्या कोठागूडूम जिल्हयातील मिरची खूप प्रसिद्ध आहे. तालुक्यातील जवळपास दोन हजार मजूर मिरची तोडणीसाठी तिकडे गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे यांचा रोजगार बंद झाला आहे. या मिरची कामगारांना प्रतिकिलो 7 ते 8 रुपये मजुरी मिळते. एक कामगार रोज 500 ते 600 रुपये कमावतो. साधारणपणे तीन महिन्यांसाठी हे काम असते.