नागपूर : Vijay Wadettiwar Reaction : राज्य सरकारने आपली चूक कबूल केली आहे. आता महाराष्ट्रातील मराठा समाजाला कळून चुकले आहे की, हा हल्ला सरकार पुरस्कृत होता असे म्हणायला हरकत नाही. मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माफी मागितली याचा आनंद असण्यापेक्षा मराठा समाजाला आनंद आहे का? हे महत्त्वाचं आहे. परंतु हे पुरस्कृत होतं हे आता सिद्ध झालं आहे, असा आरोप राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी केला आहे.
आंदोलनाचा १३ वा दिवस : मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. आज आंदोलनाचा १३ वा दिवस आहे. उपोषणकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे. समाजासाठी लढणाऱ्या माणसाची काळजी घेणे शासनाची आणि सगळ्यांची जबाबदारी आहे. तोडगा काढण्यासाठी काय करावे याचा आम्ही फॉर्म्युला सांगितला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जेवढं वाढवून द्यायचं तेवढं त्यांना द्या.
ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाढ करा :राज्यात आणि केंद्रात बहुमताचे सरकार आहे. एका झटक्यात आरक्षणाचे काम होऊ शकते. फिरवा फिरवी कशाला करता. ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजला आरक्षण द्या. ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाढ करा आणि मग हा विचार करा असे वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसी आरक्षणासाठी जीव गेला तरी चालेल : वडेट्टीवार म्हणाले, मी ओबीसीचा कार्यकर्ता आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या मूळ आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही. त्यामध्ये माझा जीव गेला तरी चालेल. सरकारला जी काही सोय करायची ती वेगळी करावी, मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावून लोकात गैरसमज पसरवण्याचे काम करू नये.