नागपूर- नागपूर कराराप्रमाणे नागपुरात होणारे अधिवेशन हे साधारणत: १ महिन्याचे असायला पाहिजे. मात्र, यावेळी ते एका आठवड्यातच गुंडाळले जाणार आहे. त्यामुळे, विदर्भातील आणि राज्यातील प्रश्नांना या एका आठवड्यात महाविकास आघाडीचे सरकार खरच न्याय देणार का? की सगळी तयारी करून फक्त औपचारिकता निभावणार, असा प्रश्न अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी उपस्थित केला आहे.
नागपूर हे कधी काळी सीपी अँड बेरार राज्याची राजधानी म्हणून ओळखले जायचे. नागपूरसह विदर्भ जेव्हा महाराष्ट्रात सामील झाला, तेव्हा नागपूर करार झाला होता. त्या करारानुसार नागपुरात राज्याचे एक अधिवेशन घेण्याचे ठरले होते. त्यानुसार दरवर्षी नागपुरात अधिवेशन होते. मात्र, ते महिनाभर चालले, असे फारच कमी वेळा झाले आहे. राज्यात आता ३ पक्षाचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यात केवळ सहा मंत्री नियुक्त झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर त्या मंत्र्यांना खाते वितरित करण्यात आले आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार अजून झाला नाही. त्यामुळे राज्यसरकारला अधिवेशनाचीच जास्त घाई असल्याची टीका विदर्भवादी नेते आणि अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी केली आहे.