नागपूर - जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापा येथे असलेल्या मोईलच्या खाणीतील मातीचा ढिगारा ढासळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका चिनी मजुरासह एका स्थानिक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पंकज चौरेवार आणि चँन गँग अशी या अपघातातील मृतकांची नावे आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून खापाच्या गुमगाव येथील मोईलच्या मँग्निज खाणीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विस्तारीकरणाचे काम चीनची कंपनी करत असल्याने त्याठिकाणी चिनी कामगार कामाला आहेत. घटनेच्या वेळी रस्ता बनवण्याचे काम सुरू असताना मँग्निजच्या खाणीत मातीचा ढिगारा ढासळल्याने 2 मजुरांचा मृत्यू झाला तर, दोन मजूर जखमी झाले. मृतकांमध्ये एक भारतीय पंकज चौरेवार आणि चँन गँग नामक एका चीनी नागरिकाचा समावेश आहे. तर, अनिल देवमन बागडे आणि युवान यंश शान अशी घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.