बहुचर्चित युग चांडक हत्या प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेपेचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
बहुचर्चित युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग या दोन्ही नराधमांना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती.
नागपूर - बहुचर्चित युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग या दोन्ही नराधमांना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुद्धा जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली असता, सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या दुहेरी फाशीची शिक्षा रद्द करून मरेपर्यंत जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे.
युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेश दवारे हा युगचे वडील डॉक्टर मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात काम करायचा. त्याला रुग्णालयाच्या बिलिंग काउंटर वर बसवण्यात आले असता, तो रुग्णांनी डॉक्टरांची फी म्हणून दिलेल्या रक्कमेत हेराफेरी करीत असल्याचे समोर आल्यानंतर डॉक्टर चांडक यांनी त्याला फटकारून कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग राजेशच्या मनात धरून आरोपी राजेशने अरविंदच्या मदतीने युगचे अपहरण केले. त्यानंतर आपले बिंग फुटेल या भीतीने दोन्ही आरोपींनी आठ वर्षीय युगचे दगडाने ठेचून हत्या केली. हत्या करण्यापूर्वी आरोपींनी युगचे वडील राजेश चांडक यांच्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली होती.