नागपूर:नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मॅनहोल्सच्या देखभालीमध्ये अधिक सुरक्षितता आणण्यासाठी हा उपक्रम नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने राबवला जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. उपस्थित होते तर स्मार्ट सिटीचे मेंटॉर आणि चेअरमन डॉ. संजय मुखर्जी मुंबईहुन उपस्थित होते.
नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले की, सध्या केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे १० जेटींग मशीन आणि ४ सक्शन मशीन (Suction machine) आहेत त्याच्या सहाय्याने मोठ्या रोडवर सिवर चेंबरची स्वच्छता करण्यास मदत होते पण लहान रोडवर हे करणे अडचणीचे ठरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत होणार आहे.