नागपूर-अरविंद बनसोड या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी आता पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. ही माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे. अरविंदच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणी कायद्यानुसार तपास केला असून आता तपासाची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहेत, असे राकेश ओला यांनी सांगितले.
अरविंद बनसोड याच्या शवविच्छेदन तपासणीच्या अहवालात मृत्यूचे कारण विषप्राशन असल्याची माहिती ओला यांनी दिली आहे. अरविंद बनसोड या ३२ वर्षीय तरुणाचा २७ मे रोजी नरखेड तालुक्यातील थडीपवनी गावात एका गॅस एजन्सीच्या संचालकासोबत वाद झाला होता. त्याने या वादानंतर कीटकनाशक द्रव्य प्राशन केले होते. २९ मे रोजी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान अरविंदचा मृत्यू झाला होता.
२७ मे रोजी अरविंद बनसोड याने थडीपवनी गावात मिथिलेश उर्फ मयूर उमरकर यांच्या गॅस एजन्सीचे बाहेरून काही फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये काढले होते. याच मुद्द्यावरून त्याचा मिथिलेश उमरकर सोबत वाद झाला होता. वाद वाढल्यामुळे काही वेळाने अरविंद याने गॅस एजन्सीच्या समोर विष प्राशन केले होते. त्यानंतर उमरकर याने स्वतःच्या गाडीत अरविंद याला उपचारासाठी आधी जलालखेडाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच अरविंदचा मृत्यू झाला होता, असे आतापर्यंतच्या पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
मिथिलेश उमरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पंचायत समिती सदस्य असून त्यांनी अरविंदला गॅस एजन्सीच्या समोर मारहाण केली होती. तसेच मिथिलेश याच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप बनसोड यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
पोलिसांनी अरविंद बनसोड याच्या आत्महत्येच्या प्रकरणात मिथिलेश उमरकर याच्यासह इतर दोघांविरोधात आयपीसी कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त करणे असा गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी याच प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.तसेच तपासाची सूत्रे पोलीस उपधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिली आहे.