नागपूर- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाला पराभूत करायचे असेल तर घरीच रहा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन शासन करत आहे. मात्र,शासनाच्या सूचनांचे पालन न करता बाहेर पडणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना पोलिसांनी अनोखी शिक्षा दिली आहे. मी बेजाबदार नागरिक असून माणुसकीचा शत्रू आहे, असे फलक हातात देऊन नागरिकांचे फोटो पोलिसांनी काढले आहेत.
लॉकडाऊनमध्ये मॉर्निंगवॉक... बेजबाबदार नागरिकांना पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा
शासनाच्या सूचनांचे पालन न करता बाहेर पडणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना पोलिसांनी अनोखी शिक्षा दिली आहे. मी बेजाबदार नागरिक असून माणुसकीचा शत्रू आहे, असे फलक हातात देऊन नागरिकांचे फोटो पोलिसांनी काढले आहेत.
वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा नागपुरातील बेजबाबदार नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी लॉकडाऊन मोडून मॉर्निंग वॉक करायला निघालेल्या बेजबाबदार नागपूरकरांकडून पोलिसांंनी फोटोसेशन करवून घेतले आहे. नागरिकांच्या हातात फलक देऊन फोटो काढत ते व्हायरल केले आहेत.
"मी समाजाचा व देशाचा शत्रू आहे..मी बेजबाबदार नागरिक असून माणुसकीचा शत्रू आहे" असे फलक हातात देऊन त्यांचे फोटो काढले आणि पुढे असे करणार नाही याची हमी घेऊन त्यांना सोडले. धक्कादायक म्हणजे या बेजबाबदार नागरिकांमध्ये अनेक लोक मोठ्या हुद्द्यावरील अधिकारी, मोठे बिल्डर्स आणि प्रतिष्ठित नागरिक ही होते. यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे कोरोनाचे संकट आणखी गडद झाले आहे.