नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. नागपुरात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप द्यायला सुरुवात केल्याने रस्त्यावरील गर्दी आता ओसरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून वारंवार सूचना करून देखील नागरिक ऐकत नसल्याने पोलीस विभागाने आक्रमक धोरण अवलंबले आहे.
नागपूरच्या अनेक भागात आज भाजी आणि दूध घेण्यासाठी निघाल्याचे कारणे सांगून अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. सकाळच्या सत्रात पोलिसांनी लोकांची दैनंदिन वस्तूंची गरज पाहून सक्ती केली नाही मात्र, त्यानंतर पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना काठ्यांचा प्रसाद देणे सुरू केले. काहींना उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली.