नागपूर -शहरात २ वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत २हत्येच्या घटना घडल्या आहेत. एका प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दुसऱ्या प्रकरणातील आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
गुन्ह्याविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी पहिली घटना ही गुरुवारी गणेश पेठ पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या कर्नल बाग परिसरात घडली आहे. अविनाश सिताराम ढेंगे (वय ६०) हे रस्त्यावर बेशुद्ध पडलेले आढळून आले होते. पोलिसांच्या मदतीने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवले होते. मृत व्यक्तीच्या डोक्यावर जखमा आढळून आल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.
पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता मृत अविनाश ढेंगे हे दारू पिण्याकरिता कळमना परिसरात गेल्याची माहिती मिळाली. तेथे त्यांचे दारू पिण्याच्या कारणावरून अमोल उर्फ सूर्या नावाच्या व्यक्ती सोबत त्यांचा वाद झाला होता. त्यावेळी आरोपी अमोल उर्फ भुऱ्या खडसरे याने अविनाश ढेंगे यांना मारहाण केली होती. या मारहाणीत अविनाश ढेंगे यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर ते घरी परत येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आज आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
घरा बाहेर झोपलेल्या व्यक्तीची गळा चिरून हत्या
दुसरी घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशी नगर रिंग रोड परिसरात घडली आहे. मृत बुद्धराम उर्फ कल्लू कैथवास हा घरा बाहेर झोपला असताना अज्ञात आरोपींनी त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी मृत कल्लूच्या पायाला दगड बांधून त्याचा मृतदेह एका विहिरीत फेकून दिला. मृत बुद्ध राम प्रॉपर्टी डीलरचे काम करायचा. त्यातूनच त्याची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला असून तपास सुरू केलेला आहे.