नागपूर -ऋषिकेश हा केवळ एकाच खेळात पारंगत नाही तर दोन खेळांमध्ये तरबेज होता. बुद्धिबळ व तायक्वांडो या खेळामध्ये त्याने प्राविण्य मिळवले होते. अभ्यासातही तो हुशार होता. इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी असणारी जेईई-मेन परीक्षा पास करून त्याची अॅडव्हान्ससाठी निवड झाली होती. नुकताच महाराष्ट्र मंडळाचा बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. त्यातही तो त्याच्या इतर मित्रांच्या पुढे होता. एरोनॉटिकल इंजिनीअरिंग करायचे हे त्याचे स्वप्न. मोठ्या पगाराची नोकरी मिळवून आई-वडिलांची सेवा करायची हे सुध्दा त्याचे स्वप्न होते. स्वप्नपूर्तीच्या दिशेने ऋषिकेश झेपावला होता. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. 3 मे रोजी असे काही अघटीत घडले की, ज्यामुळे होत्याचे नव्हते झाले आणि ऋषिकेशच्या घरातील प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.
नागपूरच्या महाल परिसरातील बडकस चौक या भागात आमले हे कुटुंब राहते. ऋषिकेश त्याचे आई-वडील व दोन बहिणी असे छोटे कुटुंब आनंदाने राहत होते. त्यातील सर्वात लहान ऋषिकेश हा बहिणीच्या अगदी जवळचा, त्यामुळे बहिण-भावातील प्रेम नेहमीच दिसून यायचे. ऋषिकेश मेहनती व हुशार मुलगा होता. ३ मे रोजी घरातील कुलरमध्ये पाणी भरत असताना विजेचा झटका लागून ऋषिकेशचा मृत्यू झाला होता.