नागपूर - शासनाने मेडिकल स्टोअर्स सुरू ठेवण्याची परवानगी दिली. मात्र, नागपुरात एका मेडिकल स्टोअरमधून चक्क दारूविक्री होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीची बियर जप्त केली असून मेडिकलच्या संचालकाला अटक केली आहे.
नागपुरात मेडिकल स्टोअरमधून दारूविक्री, 15 हजार रुपयांची बियर जप्त
कोरोना विरोधात लढा देताना लॉकडाऊन कालावधील मेडिकल स्टोअर्सची सर्वात जास्त आवश्यकता असते. त्यासाठी शासनाने मेडिकल स्टोअर्स सुरू ठेवण्याची परवानगी दिली. मात्र, काहीजण याचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे.
इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो)च्या समोर कांचन मेडीकल स्टोअर्स आहे. या दुकानाच्या संचालक निशांत गुप्ता नातेवाईकाचे दारूचे दुकान आहे. त्यामुळे त्याच्याकडून बियरच्या बाटल्या आणून मिनरल वॉटरच्या बॉक्सेसमधून त्याची विक्री केली जात होती. याची माहिती गणेशपेठ पोलिसांना मिळताच त्यांनी मेडीकलवर छापा टाकला. त्यावेळी नियमबाह्य पद्धतीने बियरची विक्री सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दुकानातून बियरच्या ९० बाटल्या जप्त करुन संचालक निशांत गुप्ताला अटक केली.