नागपूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 4 महानगरांमध्ये 'लॉक डाऊन' करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नागपूर शहर बंद करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. शहर पूर्णत: बंद झाल्यानंतर पिण्याचे पाणी, दूध, भाजी किराणा दुकाने सुरू राहणार आहेत.
याशिवाय हॉटेलमधून फक्त घरपोच सेवा सुरू राहणार आहे. या दरम्यान शहरातील सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास 1 हजार दंड लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरू नये, पुढील काही दिवस प्रभात फेरीला (मॉर्निंग वॉक) सुद्धा जाऊ नये, अशी सूचना तुकाराम मुंढे यांनी केली आहे.
नागपूर शहरात साथ प्रतिबंद कायदा लागू कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. नियम 10 नुसार नागपूर शहरात साथ प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी अतिशय महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये असे आदेश निर्गमित करण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
या काळात अत्यावश्यक ठिकाणी बस सेवा सुरू असेल, हे आदेश 31 तारखेपर्यंत राहतील. आवश्यकतेनुसार पुढील सूचना देण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
हेही वाचा -'त्या' महिला डॉक्टर विरोधात साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल