नागपूर -नागपूर महानगरपालिकेद्वारे लसीकरणासंदर्भात आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झालेली असून, येत्या १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाचा श्रीगणेशा ८ केंद्रापासून होणार आहे. कोविडच्या काळात अनेक संकटांचा सामना केल्यानंतर नव्या वर्षात लसीकरणाची सुरूवात ही नागपुरकरांसाठी सुखद बाब असणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात शहरातील ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘कोव्हिन’ अॅपवर नोंदणी केली आहे, त्याच कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
माहिती देताना नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. हेही वाचा -चिंताजनक..! राज्यातील पाच जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव
कोविड लसीकरणासंदर्भात मनपा मुख्यालयातील ‘कोरोना वार रूम’मध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी लसीकरणासंदर्भात स्थितीचा आढावा घेतला व अडचणींवर चर्चा करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच, निर्धारित वेळेच्या आधीच पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या केंद्रांवर लस देण्यात येणार
पहिल्या टप्प्यामध्ये मनपाकडे नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी शहरामध्ये आठ केंद्र तयार केली आहेत. मनपाचे सदर येथील रोगनिदान केंद्र, महाल रोगनिदान केंद्र, पाचपावली सुतीकागृह, के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), एम्स, डागा हॉस्पिटल या आठ ठिकाणच्या कोविड लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल.
आरोग्य कर्मचाऱ्यांना निशुल्क लस
प्रत्येक केंद्रावर १०० कर्मचारी याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर सर्व कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक केंद्रावर मनपाचे ४ आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी तैनात राहतील. ऐच्छिक व नि:शुल्क लस ‘कोव्हिन’ अॅपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असली तरी ती बंधनकारक करण्यात आलेली नाही. लस ही ऐच्छिक आहे. विशेष म्हणजे, लस पूर्णत: नि:शुल्क आहे. सध्या शहरात ८ केंद्रावर लसीकरण होणार असून, लवकरच या केंद्रांची संख्या वाढवून ५० पर्यंत केली जाणार आहे. यामध्ये शासकीय रुग्णालय, मनपाच्या आरोग्य केंद्रांसह खाजगी रुग्णालयांचाही समावेश राहणार आहे. या सर्व केंद्रांवरही नि:शुल्क लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या २४ तास अगोदर ‘एसएमएस’वरून केंद्राची माहिती, वेळ आदी माहिती दिली जाईल.
कोरोना संक्रमणापासून मुक्तीची सुरूवात - महापौर दयाशंकर तिवारी
नागपूर शहरात प्रत्यक्ष कोविड लसीकरणाला १६ जानेवारीपासून प्रारंभ होणे ही समस्त नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मकर संक्रांतीच्या पर्वावर शहराला मिळालेली ही गोड भेट आहे. नागपूरकर मकर संक्रांतीला आकाशात उंच पतंग उडवून कोरोनाच्या संक्रमणालाही दूर-दूर पर्यंत लोटून देत कोराना संक्रमणाच्या मुक्तीची नवी सुरूवात होणार, हा विश्वास आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोटी-कोटी अभिनंदन, अशी प्रतिक्रिया महापौर तिवारी यांनी दिली.
नागपूर शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांसह सर्व कोविड योद्धे मागील काही महिन्यांपासून घेत असलेल्या परिश्रमाचे हे फलीत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण देण्यात येत असून सर्वसामान्यांनाही लस मिळणार आहे. मात्र, लस आली म्हणून कुणीही सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये. आपला बेजबाबदारपणा कुणाच्या जिवावर बेतू शकतो. त्यामुळे, प्रत्येकाने सतर्क राहा, सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
हेही वाचा -आठ दिवसांत पोलिस भरतीची जाहिरात काढणार - गृहमंत्री अनिल देशमुख