नागपूर - कोरोना संक्रमनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल चोरण्याचा प्रकार उघडकीस येऊन काही दिवस लोटत नाही. तेच बुट्टीबोरीत आणखी धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह कचरा संकलन गाडीतून नेण्याची संतापजनक घटना घडली आहे. शिवसेना तालुका प्रमुख तुषार डेरकर यांनी बुटीबोरी नगर परिषदेच्या प्रशासनाला यासंबंधित पत्र लिहिले आहे.
नागपूरच्या बुटबोरीत कचऱ्याच्या गाडीतून नेला कोरोनाबाधिताचा मृतदेह, शिवसेना पदाधिकाऱ्याचा आरोप
बुट्टीबोरीत कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह कचरा संकलन गाडीतून नेण्याची संतापजनक घटना घडली आहे. शिवसेना तालुका प्रमुख तुषार डेरकर यांनी बुटीबोरी नगर परिषदेच्या प्रशासनाला यासंबंधित पत्र लिहिले आहे.
लिहिलेल्या पत्रात डेरकर म्हणतात, की जयराम नेवारे (वय ४७, रा. प्रभाग क्रमांक ८, जुनी वस्ती, बुटीबोरी) यांचा १३ मे रोजी घरीच कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याप्रसंगी त्यांचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी कचरागाडीचा वापर करण्यात आला. या संदर्भात डेरकर यांनी काही फोटो नगरपरिषदेला सादर केले आहे. याशिवाय १८ मे रोजी शंकुतला खांदारे (वय ७०, रा. प्रभाग क्रमांक ८, जुनी वस्ती, बुटीबोरी) यांचा मृत्यू झाला. त्यांचाही मृतदेहदेखील अशाच प्रकारे अत्यंसंस्कारासाठी नेण्यात आला. त्यावेळी काही ग्रामस्थांनी हा संपूर्ण प्रकार मोबाइलमध्ये कैद केला. यानंतर डेरकर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखखुंदे यांची भेट घेत हा प्रकार त्यांना सांगितला. त्यावर यानंतर असे प्रकार घडणार नाहीत आणि मृतदेह स्वर्ग रथात सन्मानपूर्वक अंत्यसंस्कारसाठी नेले जातील, असे चिखखुंदे यांनी सांगितले.
हा प्रकार अत्यंत संतापजनक असून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. ज्या गाड्यातून कचरा नेण्याचे काम चालते त्या वाहनातून मृतदेह नेऊन मृतदेहांची अवहेलना होत असल्याचं म्हणत कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.