नागपूर -केंद्र शासनाने कोविडशी चांगल्याप्रकारे लढा देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कामाची दखल घेतली आहे. केंद्र शासनाच्या पंचायतराज विभागाच्या वतीने प्रकाशित पुस्तिकेत जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.‘बेस्ट प्रॅक्टीसेस टु फाईट कोविड-19 बाय पंचायत ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तिकेत राज्यातील 6 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. खुर्सापार ग्रामपंचायतीने कोविडशी लढण्यासाठी केलेल्या चांगल्या उपाययोजनांचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये खुर्सापार गावाने कोरोनापासून ग्रामस्थांचे कशापद्धतीने संरक्षण केले याची माहिती देण्यात आली आहे
काय आहे खुर्सापार पॅटर्न?
गेल्या वर्षभरापासून राज्यावर कोविडचे संकट आहे. या काळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. गावातील तरुण आणि महिलांची वार्डनिहाय कोविडयोद्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोक सहभागातून शासकीय व सार्वजनीक इमारतींना सॅनीटायझर सेन्सॉर मशीन लावण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे पालन होण्यासाठी गावातील मुख्य रस्त्यावर आणि चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून गावातील व बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच गावात होणाऱ्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घालण्यात आली असून, गावात कोरोनाबाबत दिवसभर जनजागृती करण्यात येत आहे. तसेच गावात दर महिन्याला क्लोरिन फवारणी आणि धुरळणी करण्यात येत आहे.
हेही वाचा -बीकेसी कोविड सेंटरचे वादळामुळे कोणतेही नुकसान नाही उगाच राजकरण करू नका - महापौर