नागपूर - अमली पदार्थ आणि ड्रग्सच्या सेवनावरून मुंबईच्या चित्रनगरीवर अनेक गंभीर आरोप होत आहेत. केवळ मुंबईतच ड्रग्स माफिया सक्रिय नाहीत तर त्यांचे नेटवर्क संपूर्ण देशभरात पसरले आहे. नागपूर शहर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन ड्रग्स पॅडलरला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ७४ ग्रॅम एमसी ड्रग्स जप्त केले आहे. उपराजधानी नागपुरात या आधी सुद्धा एमसी ड्रग्स तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
ड्रग्स तस्करांवर अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, दोघांना अटक
नागपूर शहर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन ड्रग्स पॅडलरला अटक केली आहे. पोलिसांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला होता. अटक करण्यात आलेले आरोपी मुंबईवरून एमसी ड्रग्स विकत आणायचे आणि ते नागपुरातील ग्राहकांना विकायचे, अशी माहिती पुढे आली आहे.
मुंबईवरून दोन ड्रग्स पॅडलर ड्रग्सची खेप घेऊन नागपूरला येत आहेत. या सूचनेच्या आधारे पोलिसांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. पोलिसांना ज्या होंडा इमेज गाडीची सूचना मिळाली होती ती गाडी दिसताच पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली असता त्यात ७४ ग्रॅम एमसी ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी अंकित पांडे आणि हनी ठाकूर या दोघांना अटक केली आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि इतर साहित्य असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेले आरोपी मुंबईवरून एमसी ड्रग्स विकत आणायचे आणि ते नागपुरातील ग्राहकांना विकायचे, अशी माहिती पुढे आली असून या प्रकरणात शाबाज नावाच्या आणखी एका आरोपीचे नाव पुढे आले आहे.
हेही वाचा -नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला कोरोनाचा विळखा; जिल्हाधिकाऱ्यांसह ५० कर्मचाऱ्यांना लागण