मुंबई -आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुलात अत्याधुनिक सुविधा व वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करत आहे. त्याचाच भाग म्हणून एमएमआरडीएने आजपासून बीकेसीमध्ये युलू बाईक सेवा सुरू केली आहे. आज एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. विजेवर चालणारी ही बाईक भाड्याने उपलब्ध करून देण्यात येणार असून या युलू बाईकने बीकेसीत कुठेही फिरता येणार आहे. ज्याप्रमाणे भाड्याने सायकल वापरली जाते, त्याप्रमाणेच या युलू बाईकचा वापर करता येणार आहे. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक आणि कुर्ला रेल्वे स्थानकबाहेर या बाईक भाड्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
बीकेसीत दररोज नोकरी व कामाच्यानिमित्ताने 3 लाख लोकांची ये-जा असते. त्यामुळे बीकेसीत येणाऱ्यांच्या सोयीसाठी आता एमएमआरडीएने युलू बाईक ही संकल्पना आणली आहे. स्मार्ट वाहतूक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीकोनातून ही युलू शेअर बाईक योजना आणली आहे. एकूण 100 युलू बाईक एमएमआरडीएकडून विकत घेण्यात आल्या आहेत. वांद्रे पूर्व स्थानक आणि कुर्ला स्थानकाबाहेर युलू झोन तयार करण्यात आले आहेत. बीकेसीत अनेक ठिकाणी युलू बाईक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
कुर्ला किंवा वांद्रे स्थानकावरून पूढे ज्यांना बीकेसीत कुठेही जायचे असेल त्यांना ही बाईक भाड्याने घेता येईल. मात्र, त्यासाठी स्मार्ट फोन असणे गरजेचा आहे. यासाठी फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून युलू अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करत बाईकचा नंबर टाकून बाईकचे भाडे भरावे लागेल. मग ही बाईक घेऊन तुम्हाला प्रवास करता येईल. काम झाल्यानंतर बाईक ज्याठिकाणाहून घेतली तिथे पुन्हा जमा करून वापरलेल्या तासाप्रमाणे ई पेमेंट करावे लागेल.
दरम्यान, विजेवर चालणाऱ्या या युलू बाईक इको फ्रेंडली आहेत. त्यामुळे या बाईकचा अधिकाधिक लोकांनी वापर करावा. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मदत करावी, असे आवाहन महानगर आयुक्त राजीव यांनी केले. या नव्या सेवेला मुंबईकर कसा आणि किती प्रतिसाद देतात हे लवकरच समजेल.