मुंबई Western Railway : पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून उपनगरीय एसी रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासून (6 नोव्हेंबर) 17 अधिक एसी लोकल ट्रेन धावणार असून या ट्रेन डहाणू रोडपासून अंधेरी ते चर्चगेट पर्यंत चालवल्या जाणार आहेत. चर्चगेट पश्चिम रेल्वे स्थानकाचे सुरुवातीचे रेल्वे स्थानक आहे. येथून विरार डहाणूसाठी जलद लोकल ट्रेन आहेत. परंतु त्या ट्रेनसह काही एसी लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढल्या पाहिजे, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. त्यानंतर ही मागणी लक्षात घेत 17 फेऱ्यांत वाढ करण्यात आलीये.
अशा असतील फेऱ्या :यामध्ये अपच्या दिशेने 9 तर डाऊन दिशेच्या 8 फेऱ्या असणार आहेत. अप दिशेला नालासोपारा-चर्चगेट, विरार-बोरीवली आणि भाईंदर -बोरीवली दरम्यान एक सेवा, विरार-चर्चगेट दरम्यान दोन सेवा आणि बोरीवली-चर्चगेट दम्यान चार सेवा असतील. तसंच डाउन दिशेला चर्चगेट-भाईंदर आणि बोरीवली-विरार एक सेवा, चर्चगेट-विरार आणि चर्चगेट-बोरीवली दरम्यान तीन सेवा असणार आहेत.
डहाणू लोकलची एक जोडी विस्तारित केली जाणार :डहाणू रोड लोकलची एक जोडी चर्चगेटपर्यंत विस्तारित केली जाणार आहे. अप मार्गावरील लोकल सकाळी 06:05 वाजता डहाणू रोड येथून सुटेल आणि सकाळी 08:23 वाजता ती चर्चगेटला पोहचेल. डाऊन मार्गावरील लोकल चर्चगेट येथून 7:30 वाजता सुटेल आणि 9:50 ला डहाणू रोड येथे पोहचेल.
शनिवार-रविवारमध्ये नॉन एसी ट्रेन चालवल्या जातील :दरम्यान, या 17 अधिकच्या ट्रेन सोमवार ते शुक्रवार एसी पद्धतीनं चालवल्या जातील. मात्र, शनिवार-रविवार बिगर एसी पद्धतीनं या लोकल ट्रेन चर्चगेट ते डहाणू रोड पर्यंत चालवल्या जातील. अंधेरी, बोरीवली, विरार, भाईंदर, दादर ,मुंबई सेंट्रल चर्चगेट असा मार्ग असेल. 17 एसी ट्रेन पैकी नऊ या चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या असतील, तर आठ या चर्चगेटवरुन डहाणू रोड दिशेनं जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्कप्रमुख सुमित ठाकूर यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना दिली.