मुंबई - साकीनाका अंधेरी पूर्व येथे काल (गुरुवार) सायंकाळी रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असतानाच पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. उच्च दाबामुळे पाण्याचा कारंजा उडत होता. यामुळे साकीनाका परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना फुटली पाईपलाईन
अंधेरी पूर्व येथील साकीनाका परिसरातील हर्मनी अपार्टमेंट, कृष्णलाल मारवाह रोड येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान सायंकाळी 7.23 वाजण्याच्या सुमारास रस्त्याखालून जाणाऱ्या 72 इंची व्यासाच्या पाण्याच्या पाईपलाईनचा वॉल तुटला. पाईपलाईनचा वॉल तुटल्याने पाईपलाईनमधून उंच फवारे उडू लागले. पाण्याची पाईपलाईन फुटल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. मुंबई पोलिसांनी पाईप लाईन फुटल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिली. पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच वॉर्डमधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
पाईपलाईन फुटल्याने या भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. याचा परिणाम म्हणून साकीविहार रोड, मारवाह इस्टेट, चांदीवली फार्म रोड, सेठ केमिकल रोड, चांदीवली म्हाडा आणि मिलिंद नगर या विभागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर या विभागातील पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे.