मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्त्यव्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी म्हटले आहे.
शिवाजी महाराज यांचा अपमान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता. अशाप्रकारे अपमान करणे ही त्यांची वंश परंपरा आहे. मात्र, असे अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र त्यांची जागा दाखवून देतो. नेहरू यांना देखील त्यावेळी महाराष्ट्राची माफी मागावी लागली होती. राहुल गांधी यांना देखील महाराष्ट्राची माफी मागावी लागेल, असे रणजित सावरकर म्हणाले.
हेही वाचा -प्लास्टिक मुक्त भारत करण्याचा विडा उचललेल्या इंजिनिअरची प्रेरणादायी कहाणी
राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधी वक्तव्याचा सावरकर प्रेमींनी सावरकर स्मारकासमोर निषेध नोंदवला. यावेळी सावरकर प्रेमींच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून जाळण्यात आले.
सावरकरांच्या विरोधात काय म्हणाले राहुल गांधी
दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसने शनिवारी भारत बचाव रॅली आयोजित केली होती. यावेळी बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’च्या वक्तव्यासाठी माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर “माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही”, असे ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या त्यांच्यावर टीका केली जात आहे.
हेही वाचा -'अमित शाहजी तुम्ही मित्र कसे गमवावे यावर पुस्तक लिहू शकता', ओवेसी यांची टीका