मुंबई:तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला शीझान खानला पालघर जिल्ह्यातील वसई न्यायालयाने जामीन मंजूल केला. हा जामीन मंजूर करताना वसई न्यायालयाने काही अटी ठेवल्या आहेत. त्या अटींचे शीझान खानला पालन करणे बंधनकारक असणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीझानला अटक करण्यात आली होती.
शीझानची जामीनावर सुटका: पालघरमधील वालीवजवळ एका टीव्ही मालिकेच्या सेटवर 24 डिसेंबर 2022 रोजी तुनिषा शर्माने आत्महत्या केली. यानंतर तुनिषा शर्माच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शीझान खानला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. तो सध्या तुरुंगात आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर डी देशपांडे यांनी खानची 1,00,000 रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने ठेवल्या अटी: वसई न्यायालयाने २ मार्चच्या सुनावणीनंतर निर्णय स्थगित ठेवला होता. या प्रकरणात वालीव पोलिसांनी गेल्या महिन्यात ५२४ पानांचे आरोप पत्र दाखल केले होते. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर शीझान खानने पुन्हा एकदा जामिनासाठी याचिका दाखल केली होती. यावेळी वसई न्यायालयाने शीझानला अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला. शीझान खानला त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश वसई न्यायालयाने दिले आहेत. तसेच न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय देश सोडू नये, असेही त्याला सांगण्यात आले आहे.