मुंबई : भरत सिंह हा दिल्लीतील कलावल नगर येथे कॉल सेंटरमध्ये नोकरी करतो. तर कमल कुमार हा दिल्लीत राहणारा असून इव्हेंट मॅनेजमेंटचा धंदा करतो. या गुन्ह्याचा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक वैशाली श्रावगी यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा माग काढला आहे. तक्रारदार यांना १५ जून २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२पर्यंत वेगवेगळ्या अनोळखी मोबाईल क्रमांकावरून अनोळखी आरोपींनी निहारीका कपुर, अलका विश्वास, अशोक महाजन, मनिष मल्होत्रा, राहुल जैन, राघव दयाल, संजय दिवाण व रोहित कुमार अशा वेगवेगळ्या नावांनी संपर्क साधून ते HDFC Life Insurance कार्यालयातून बोलत आहेत असे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाची HDFC LIFE POLICY असल्याचे खोटे सांगून तिचा शेवटचा प्रिमियम २३ मार्च २०१५ रोजी भरलेला आहे असे सांगितले. या पॉलिसीची फन्ड रिलिज रक्कम 18 लाख 79 हजार मिळणार असल्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्याकरीता HDFC Lifeचे बनावट, अप्रुव्हल लेटर फिर्यादी यांच्या व्हॉट्ॲप वर पाठविले. त्यानंतर प्रोसेसिंग फी, ब्रोकरेज चार्जेस, टॅक्स चार्जेस व पॉलिसीची फन्ड रिलिज चार्जेसच्या नावाखाली त्यांची एकूण ११ लाख १८ हजार ५५० रुपयांनी फसवणूक केली.
मुद्देमाल जप्त :त्यानंतर फिर्यादी यांनी केलेल्या तक्रारीवरून पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात प्राप्त तपशीलाचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्याच्या तपासकामी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेचे पोलीस पथक हे दिल्ली येथे रवाना झाले. त्यांनतर पोलीस पथकाने प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या विश्लेषणावरून या गुन्हयामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून विविध मोबाईल आणि विविध क्रमांकांचे सीम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.