मुंबई - शहरातील मुजोर रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावर परिवहन खात्याकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 2 महिन्यात 5 हजार रिक्षा चालकांना दंड भरावा लागला आहे, तर 2,689 रिक्षा चालकांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत. ज्यात 719 परवाने हे भाडे नाकारल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत.
मुंबईत परिवहन विभागाकडून मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई; 2,689 रिक्षा चालकांचे परवाने जप्त
शहरातील मुजोर रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावर परिवहन खात्याकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 2 महिन्यात 5 हजार रिक्षा चालकांना दंड भरावा लागला आहे, तर 2,689 रिक्षा चालकांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत. ज्यात 719 परवाने हे भाडे नाकारल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत.
परिवहन विभागाकडून ही कारवाई करण्यासाठी तब्बल 14 पथके बनविण्यात आली होती. या पथकातील अधिकारी सामान्य प्रवासी बनून रिक्षा चालकांना इच्छित स्थळी नेण्यास सांगायचे. यात शेकडो रिक्षाचालकांनी जवळचे भाडे नको म्हणून भाडं नाकारत असताना या पथकाने या संदर्भात या रिक्षाचालकांवर कारवाई करीत 2600 परवाने रद्द केले आहेत. रद्द केलेले परवाने या रिक्षाचालकांना पुन्हा न मिळावेत म्हणून त्यांच्या वर झालेल्या कारवाईचे संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्डिंग या दरम्यान करण्यात आले आहेत.
परिवहन विभागाने केलेल्या कारवाईत गेल्या 2 महिन्यात 5426 प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. यात रिक्षा भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांची संख्या 719 एवढी असून प्रमाणापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या 39 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या 358 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 3268 परवाना व बॅच नसलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई झाली आहे. एकूण 2689 रिक्षाचालकांचे परवाने जप्त करून 173 रिक्षाही परिवहन विभागाने जप्त केल्या आहेत.