मुंबई :राष्ट्रवादीविरोधात बंड करून अजित पवार हे शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी त्यांच्या आठ सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी भाजप, शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय का घेतला असावा, असे अनेक तर्कवितर्क राजकीय विश्लेषक लावत आहेत. थोड्या दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची शक्यता असल्यामुळे पुढील महायुतीचे मुख्यमंत्री अजित पवार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे आरएसएस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांच्या नावाला विरोध असल्याचा गौप्यस्पोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत केला आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये पक्षाचे नेतृत्व कोण करणार यावरून संघर्ष सुरू होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पक्षांतर्गत संघर्षामुळेच आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवारांना भीती होती की, सुप्रिया सुळेंकडे सर्व जबाबदारी दिली, तर अजित पवार पक्ष सोडून जातील. कार्यकर्ते आणि पक्ष नेत्यांच्या आग्रहास्तव आणि अजित पवार पक्ष सोडणार नसल्याची खात्री केल्यानंतरच शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला होता, असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी मुलाखतीत म्हटले आहे.
अजित पवारांच्या नावाला विरोध :सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. दरम्यानच्या काळामध्ये अजित पवारांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या दोघांमध्ये मध्यस्थीची भूमिका प्रफुल पटेल यांनी निभावली. भाजपसोबत सेटलमेंट करताना अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची अट ठेवली होती. यामुळे भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी भाजपामध्ये एकमत होत नव्हते. तर, दुसरीकडे आरएसएस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध दर्शवला. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे का, नाही? यावर आजही भाजपात एक मत होत नसल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
निर्णय तुमच्यावर सोडला :राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर प्रत्येक आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वैयक्तिक भेट घेतली. त्यांनी स्वतःच्या,अडचणी, पक्षातून बंडखोरी करण्याचा निर्णय का घ्यावा? लागला याविषयीच्या भावना प्रकट केल्या असल्याचाही दावा चव्हाण यांनी केला आहे. अशा द्विदा मनस्थितीत असलेल्या आमदारांना, सहकाऱ्यांना काय निर्णय घ्यायचा, तो तुम्हीच घ्यावा. तो निर्णय तुमच्यावर सोडला आहे अशा प्रकारचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता, असा दावा एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
हेही वाचा -Ravi Rana Targets Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणजे पावसाळी . . , विदर्भ दौऱ्यावरुन भाजप आमदाराची ठाकरेंवर टीका