मुंबई - मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावरून एक अंध महिला लहान मुलगा घेऊन जात होती. यादरम्यान त्या मुलाचा तोल गेला आणि रेल्वे रूळावर जाऊन कोसळला. त्याच वेळी समोरून रेल्वे येत होती. रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वेच्या पॉईंटमने प्रसंगावधान राखत या चिमुकल्याचे प्राण वाचवले. ही थरारक घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
काय आहे प्रकरण -
शनिवारी एक अंध महिला रेल्वे स्थानकावर उभी होती. अचानक तिच्याजवळचा लहान मुलगा रेल्वे रूळावर पडला. त्याच वेळेस 5 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास उद्यान एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर येत होती. घाबरलेली अंध महिला आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती. मात्र, तिला फलाटाचा अंदाज येत नसल्याने ती चाचपडत होती. त्याच वेळेस ड्युटीवर असलेले पॉईंटमन मयूर शेळके हे ट्रॅकमधून तिथे धावत आले आणि क्षणार्धात त्या मुलाला फलाटावर उचलून स्वतःही फलाटावर गेले. मयूर शेळके यांनी जीवावर उदार होऊन या चिमुकल्याचे प्राण वाचवले.
थरार सीसीटीव्हीमध्ये कैद -
ही संपूर्ण घटना वांगणी रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पॉईंटमन मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत या मुलाचे प्राण वाचवले त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक देखील होत आहे.