मुंबई -उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 24 फेब्रुवारीच्या रात्री एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने(राष्ट्रीय तपास यंत्रणा) अटक केली आहे. या प्रकरणाचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पीपीई कीट घालून फिरताना दिसत आहे. पीपीई कीट घातलेली व्यक्ती सचिन वाझे, असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे एनआयए वाझे यांना पीपीई कीट घालून चालवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वाझेंनी जमा केलेल्या पुरावे देखील गायब -
मुकेश अंबानी यांच्या घरा शेजारी सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तपास अधिकारी असलेल्या सचिन वाझेंनी तपास करताना ठाण्यातील दुकानदाराची डायरी, सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. माञ, या वस्तू कायद्यानुसार त्यांनी रेकॉर्डवर घेतल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासाच्या नावाखाली वाझे यांनी पुरावे नष्ट केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.