मुंबई - केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाशी लढा देत असून या लढाईत विरोध पक्ष महाराष्ट्र सरकारच्या सोबत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटसमयी विरोधी पक्षांसह सर्व पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. त्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी होती, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सर्वपक्षीय बैठकीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, खा. रामदास आठवलेंची मागणी
केंद्र व राज्य सरकारची कोरोनाविरुद्ध लढाई सुरू आहे. या लढाईत विरोधी पक्षही सरकारच्या सोबत आहे. अशा संकट समयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षानांही विश्वासात घ्यायला पाहिजे. त्यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर सहकारी मंत्री चांगले काम करत आहेत, कोरोनाशी चांगली लढा देत आहेत. मात्र राज्यावर एखादे मोठे संकट आले तर राज्यातील विरोधी पक्ष आणि इतर सर्व पक्षांच्या नेत्यांचा सल्ला घेण्याची, त्यांची चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याची परंपरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या परंपरेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी पण ती अद्याप घेतलेली नाही. आम्ही सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत आहोतच. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्राला आणि राज्याला मोठ्या संख्येने निधीची गरज लागणार आहे. त्यानुसार आठवले यांनी पीएम केयर फंडात आपल्या खासदार निधीतून १ कोटी आणि आपले दोन महिन्याच्या वेतनाचे ४ लाख रुपये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. तर आठवले यांच्या वांद्र्यातील संविधान या निवासस्थानी मजुरांना दोन वेळे मोफत जेवणही दिले जात आहे. लॅाकडाऊन सुरू असेपर्यंत, १४ एप्रिलपर्यंत २०० गरजू मजुरांना मोफत जेवण दिले जात आहे.