महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष बातमी : कोरोनाचा देवांनाही आर्थिक फटका, देणग्यांमध्ये घट

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम धार्मिक स्थळांवर आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

temples-donations-figures-drops-to-its-lowest-due-to-covid-19-lockdown-period-in-maharashtra
विशेष बातमी : कोरोनाचा देवांनाही आर्थिक फटका, देणग्यांमध्ये घट

By

Published : Sep 11, 2020, 7:41 PM IST

Updated : Sep 16, 2020, 3:20 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. त्यामुळे राज्यात मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनचा फटका सर्वच स्तरातील व्यवसाय, उद्योग, नोकऱया यांना बसला आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्वच धार्मिक स्थळं मार्च महिन्यापासूनच बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका मंदिर संस्थानच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिमाण धार्मिक स्थळांवर आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भातील 'ईटीव्ही भारत'ने राज्यातील महत्वाच्या मंदिर संस्थानांमधील घेतलेला आढावा...

कोरोनाचा देवांनाही आर्थिक फटका

कोरोना काळात साईचरणी 21 कोटींची देणगी

शिर्डी -कोरोना व्‍हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्‍यावतीने लॉकडाऊन करण्‍यात आले. त्यामुळे १७ मार्च २०२० पासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले आहे. १७ मार्च ते ३१ ऑगस्‍ट २०२० पर्यंत साईभक्‍तांकडून विविध प्रकारे २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली आहे. मागील वर्षी याचकालावधीत २०३ कोटी ३७ लाख ७१ हजार ७९५ रुपये इतकी देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली होती.

दरम्यान, मागील वर्षाच्‍या तुलनेत सुमारे १८२ कोटी ६१ लाख १७ हजार ६४४ रुपये इतकी देणगीची घट झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

मागील वर्षी १७ मार्च २०१९ ते ३१ ऑगस्‍ट २०१९ या कालावधीत दक्षिणा पेटीद्वारे साईभक्‍तांकडून ७५ कोटी २९ लाख ७८ हजार ९२७ रुपये इतकी देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली होती. मात्र, यावर्षी कोरोनाच्‍या संकटामुळे मंदिर बंद असल्‍याने १७ मार्च २०२० ते ३१ ऑगस्‍ट २०२० कालावधीमध्‍ये दक्षिणा पेटीद्वारे साईभक्‍तांकडून कोणतीही देणगी प्राप्‍त झाली नाही.

कोरोनामुळे तुळजाभवानी मंदिराच्या देणगीत घट

उस्मानाबाद - कोरोना व्हायरसचे भयंकर परिणाम मानवांसह देव-देवतांच्या संस्थानांलाही बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्योगांबरोबरच मंदिर देखील बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिर संस्थानच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर बंद करण्यात आल्यापासून आजपर्यंत 2018-2019 च्या तुलनेत जवळपास 27 कोटी 73 लाख 56 हजार रुपये तोटा सहन करावा लागला आहे. 2018-19 मध्ये तुळजाभवानीला 28 कोटी 91 लाख 67 हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न झाले होते, तर 2017-18 मध्ये 22 कोटी 14 लाख 20 हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र, 2020 या वर्षात गेली 6 महिन्यांपासून तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने मंदिर संस्थांचे उत्पन्न घटले आहे. 18 मार्च 2020 पासून आतापर्यंत 11 कोटी 81 लाख 10 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

आता सध्या मंदिरातील दैनंदिन विधी सुरळीत पार पाडले जात आहेत. तुळजाभवानी मंदिराचे आर्थिक उत्पन्न हे दानपेटी, देणगी व गुप्त दान, वेगवेगळ्या लिलाव प्रक्रिया, ऑनलाइन देणगी त्याचबरोबर अन्य 73 मार्गातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र, मंदिर बंद असल्याने व भाविक दर्शनासाठी येत नसल्याने मंदिराच्या आर्थिक उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

राज्यात अनलॉक, मात्र तीर्थक्षेत्र शेगावची अर्थव्यवस्था ठप्प

बुलडाणा - राज्यातील लॉकडाऊनचे नियम अर्थचक्राला गती मिळावी म्हणून शिथिल केले खरे, पण विदर्भातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावचे अर्थचक्र मात्र भाविकांविना ठप्प आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर सद्याही बंद आहे. त्यामुळे नेहमी दररोज जवळपास एक ते दीड कोटींची उलाढाल होत असलेल्या शहरात आता भक्तांविना अर्थचक्र ठप्प झाले आहे. त्यामुळे मोठे हॉटेलपासून ते सामान्य विक्रेत्यांवर मोठी आर्थिक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

शेगावात दररोज लाखो भक्त देशातील अनेख भागातून येत असतात. पण, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आणि देशातील सर्व धार्मिक तीर्थक्षेत्र बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला. यामुळे सर्वच रस्ते ओसाड दिसत होती. एरवी रोज लाखो भक्त येथे हजेरी लावत होते. त्यामूळे या शहरातील हजारो छोटे मोठे व्यावसायिक आपला उदरनिर्वाह करत होते. पण, लॉकडाऊननंतर या शहरातील अर्थचक्र रुतून पडले आहे. याला लवकर गती देणे गरजेचे असल्याचे येथील व्यापारी सांगतात.

सहा महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे सहा कोटी, तर सप्तश्रृंगी मंदिराच्या देणगीत साडे पाच कोटींची घट

नाशिक -येथील प्रमुख देवस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आणि सप्तश्रृंगी देवस्थान मागील 6 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे भाविक येत नसल्याने मंदिराच्य आर्थिक उत्पन्नात घट झाली आहे.

श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर

श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टला दरवर्षी दर्शन निधी, पावती देणगी, ऑनलाइन देणगी, अन्नछत्र देणगी तसेच दानपेटीच्या माध्यमातून 12 कोटीं रुपयांच्या देणग्या येत असतात. मात्र, मागील सहा महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने त्र्यंबकेश्वर ट्रस्टच्या देणगीत तब्बल 6 कोटींची घट झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागबलीसारखे महत्वाचे धार्मिक विधी होत असल्याने वर्षभरात देशभरातून लाखो भाविक येथे येत असतात.

त्र्यंबकेश्वरचे 90 टक्के अर्थकारण हे मंदिराशी निगडित आहे. यावर अवलंबून असलेले फुल, प्रसाद, पूजा साहित्य विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, गाईड, ट्रॅव्हल्स यासोबत पुरोहितांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून दर महिन्याला 1 कोटी हून अधिक अर्थचक्र त्र्यंबकेश्वरमध्ये होत असते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून मंदिरच बंद असल्याने यावर अवलंबून असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

श्री सप्तश्रृंगी मंदिर (वणी)

वणी येथील श्री सप्तश्रृंगी मंदिर हे महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ मानले जाते. देवी मातेचे हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रासह भारतातून रोज शेकडो भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी मंदिराला पावती देणगी, ऑनलाइन देणगी, अन्नदान देणगी, भक्त निवास देणगी अशा वेगवेगळ्या माध्यमातून दरवर्षी 13 ते 14 कोटींच्या देणग्या येत असतात. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देणगीत तब्बल साडे पाच कोटींची घट झाली आहे. तसेच वणी गावचे 90 टक्के अर्थकारण हे मंदिरावर अवलंबून आहे. त्यामुळे येथे असलेले फुल, प्रसाद, पूजा साहित्य विक्रेते तसेच हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून दर महिन्याला 70 ते 80 लाखांचे अर्थचक्र फिरत असते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

अंबाबाई मंदिरातील उत्पन्नावर कोरोनामुळे परिणाम; अनेक कोटींचा तोटा

कोल्हापूर - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातील भक्त येत असतात. मात्र, कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. मंदिरांचे दरवाजेसुद्धा बंद झाले. गेल्या 5 महिन्यांपासून सर्वच मंदिरं बंद आहेत. अद्यापही मंदिरं सुरू करण्याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी मंदिरात भाविकच येत नसल्याने मोठ्या प्रमाणात जमा होणारी देणगी जमा होऊ शकली नाही.

मार्च ते ऑगस्ट अशा 5 महिन्यात जवळपास 9 ते 10 कोटींचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी याच 5 महिन्यात जवळपास 10 कोटींहून अधिक अंबाबाई चरणी देणगी प्राप्त झाली होती. यावेळी मात्र 5 महिन्यांच्या काळात ऑनलाइन स्वरुपात जवळपास 17 लाखांची देणगी प्राप्त झाली असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले आहे.

अंबाबाई चरणी प्रत्येक महिन्याला जवळपास 1 कोटी 75 लाखांहून अधिक देणगी येत असते. शिवाय सोने चांदीचे दागिनेसुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात. ते मात्र पूर्णपणे ठप्प झाले असून, किरकोळ स्वरूपात सोने चांदीची देणगी लॉकडाऊन काळात प्राप्त झाली असल्याचेही अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले आहे.

कोरोनामुळे पंढरपूर देवस्थान समितीच्या देणग्यांमध्ये यंदा घट

पंढरपूर - मागील वर्षी 17 मार्च ते 31 ऑगस्ट या काळात 18 कोटी 85 लाख रुपये उत्पन्न विठ्ठ्ल-रुक्मिणी देवस्थानला मिळाले होते. यंदा समितीला या आषाढी वारीसह केवळ 1 कोटी 41 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सुमारे 17 कोटी रुपयांचे उत्पन्न कमी मिळाले.

विठ्ठल मंदिर समितीकडून लॉकडाऊन काळात सामाजिक व अनेक विविध कामांसाठी सुमारे 1 कोटी 73 लाख 5 हजार रुपये खर्च झाला. त्यात कोरोना महामारीसाठी समितीकडून एक कोटी निधी देण्यात आला आहे. या शिवाय मंदिर कर्मचारी यांचे पगार आणि इतर खर्च सुमारे अडीच कोटी इतका झाला आहे.

Last Updated : Sep 16, 2020, 3:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details