मुंबई -लोकसभा सचिवालयाच्या संसदीय अभ्यास व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व आमदार व विधानभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देशी-विदेशी भाषा शिकवणी वर्ग येत्या २२ जूनपासून भरविण्यात येणार आहेत. जर्मन, फ्रेंच, जपान, रशियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या आंतरराष्ट्रीय तर बंगाली, गुजराती, मराठी, ओडिया, तमिळ, तेलुगू या राष्ट्रीय भाषांचा यात समावेश आहे.
22 जूनला शुभारंभ -
बोलीभाषा न समजल्यामुळे अनेकदा अडचणी येतात. लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना देशी-विदेशी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा सचिवालयाच्या संसदीय अभ्यास आणि प्रशिक्षण संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. क्षमता अभिवृद्धी कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील आमदार व विधानभवनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देशी-विदेशी भाषा शिकण्यासाठी ऑनलाइन वर्ग शिकवले जाणार आहेत. २२ जूनला या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे.